आज बाजारात पूजेच्या सामानाची गर्दी होती. बायकांची लगबग
घरी येताच सूनबाई नीताकडे बघत बोलले, “ मी येई पर्यंत ही माझी वाट बघेल का ग…?
“ बाबा, असे का म्हणताय…”
नीताच्या लक्षात आले . उद्या वटसावित्री पौर्णिमा म्हणून बाबांना
आईची आठवण येत असेल .
“ आई तुम्हाला एकट्याला सोडणार नाहीत. सात जन्मासाठी
त्यांनी बांधून ठेवलेले आहे तुम्हाला..”
“ हो ना ..किती मनोभावे ही पूजा करायची .. मी मस्करीत
बोलायचो …” मला चॉईस तरी दे दुसरा, अशी अडकवून ठेवू
नको मला .. माझे हे बोलणे तिने मनावर घेतले नसेल ना …”
“ नाही हो बाबा , तुमची जोडी सात जन्मासाठी ब्रह्मदेवाने बांधली
आहे. अश्या कश्या सोडून जातील …”
नीता सासऱ्यांना समजावत होती पण त्यांची ही अवस्था पाहून तिचे मन भरून आले.
आताचे बाबा व आई असतानाचे बाबा यात कितीतरी अंतर होते
याचा विचार नीता करू लागली
आई गेल्यापासून बाबा शांत झाले होते. पूर्वी जशी त्यांची घरात
वर्दळ होती, हसणं, खिदळणं, चहा करता करता आईशी चाललेलं
बोलणं – ते सगळं अचानक विरून गेलं होतं. आई गेल्या तसे
घरातलं जीवनच गोठून गेल्यासारखं झाले होते.
वटपोर्णिमा म्हणजे आईसाठी फार खास दिवस असायचा.
पहाटेपासून सगळं आवरून, पूजा साहित्य तयार करून त्या
वडाच्या झाडाची पूजा करायच्या. पूजेची त्यांची तयारी
बघण्यासारखी असायची. इतर वेळा तयार होण्याचा त्या कंटाळा
करायच्या पण वटपोर्णिमेच्या दिवशी अगदी नवरी प्रमाणे तयार
होत असत . बाबा त्याना नियमित मोगऱ्याचा गजरा घेऊन यायचे.
माझं लग्न होऊन मी इथे आले. मला नोकरी मुळे वेळ नसायचा
या पूजेला व माझा अश्या अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता पण दरवर्षी
मी ऑफिस मधून आईना फोन करून विचारायचे“वडाला सात
प्रदक्षिणा घातल्या का ?” असं चिडवायचे. त्या हसून म्हणायच्या
“तुझ्या बाबांसाठी करते बाई, सात जन्मांचं साथ हवी.” आणि
बाबा एका कोपऱ्यात बसून हसत बोलायचे, सात जन्म माझी
सुटका नाही ..,”
पण उद्या … उद्या काहीतरी वेगळं होतं.
नीताने उद्याची सुट्टी घेतली .तिने ठरवले होते की यावर्षी आई
सोबतच्या बाबाच्या आठवणी पुसून न टाकता त्यांच्या बरोबर
वटपोर्णिमा करायची. आईच्या आठवणींसोबत. सासूबाईच्या
जागी स्वतः उभी रहायचं ठरवलं होतं. पण हे सगळं बाबांना कसं
सांगायचं, हे कळत नव्हतं.
बाबा ताटकळत बाल्कनीत उभे होते. त्यांच्या समोरची वडाचं झाड
आजही तसंच डौलात उभं होतं. पण त्याच्या सावलीत
उभं असलेलं जीवन आता हरवलेलं होतं.
“बाबा, चहा करू का?” नीताने विचारलं.
ते नुसते मान हलवून आत आले. त्यांच्या चालण्यात थकवा नव्हता
, पण आत्मा थकल्यासारखा वाटत होता.
“आज वटपोर्णिमा आहे ना,” नीता हळूच बोलली .
त्यांनी हलकीशी मान डोलावली . काहीतरी दाटून आलं त्यांच्या
डोळ्यांत. पण ते थांबले. शब्द बाहेर पडले नाहीत.
“बाबा, मी पूजा करणार आहे.” तिने हळूच सांगितले
ते क्षणभर थबकले. नीता कडे बघितलं आणि नंतर त्यांनी नजर
झुकवली.
“ती नाही आता… मला काय उपयोग आहे गं आता?” ते म्हणाले.
नीताने त्यांच्या हातावर हात ठेवला. “आईचं आयुष्य त्यांनी
तुमच्यात पाहिलं, आणि त्या साथीत सुख शोधलं. त्यांच्या
आठवणीत, आपण पुन्हा तो क्षण जिवंत ठेवू या.”
संध्याकाळी नीता सासऱ्या सोबत वडाजवळ गेली . सासूबाई
सारखी साडी नेसली होती. पुजा थोडी फार त्यांच्या सारखी केली
होती . बाबा शांत होते, पण त्यांची नजर वडाच्या फांद्यांतून काही
शोधत होती.
बाबांना वड़ाला प्रदक्षणा घालणारी त्यांची अर्धांगिनी दिसली…
पूजा आटपून दोघे घरी आले त्यावेळी बाबांचा चेहरा बदलला होता.
“ नीता , आज मला ती दिसली ..”
“ काय ..”
" हो .. तू फेरे घेत होती त्यावेळी ती मागे वळून हसत होती मला
पाहून…मला म्हणत होती याच जन्मी नाही तर पुढचे सात
जन्म मी तुम्हाला सोडणार नाही. काळजी करू नका. आनंदात
रहा मी तुमच्या सोबतच आहे .” बाबा हळू आवाजात बोलत होते.
नीता सासऱ्यांच्या शेजारी जाऊन बसली त्यावेळी बाबा मनापासून
बोलत होते
“तिच्या निधनाच्या रात्री, मी पहिल्यांदा इतका रिकामा वाटलो.
श्वास घेत होतो, पण ती नव्हती. तिचा गंध नव्हता, ती वेळ
नव्हती… आणि ही वटपोर्णिमा... नीता, माझ्यासाठी एक नवीन
आशा निर्माण करून गेली....”
बाबा पहिल्यांदाच एवढं बोलत होते. त्यांची भावना बाहेर पडत होत्या
“माझ्या आयुष्यात किती वेळा तिचा राग आला असेल… पण
प्रत्येक रागाच्या शेवटी तिच्या हातचा चहा मला लागत असे .
तिला माहिती होती की , चहा प्यायल्या शिवाय माझा रंग जाणार
नाही . चहा हातात देत ती बोलायची, ‘बापरे, किती चहा पिताय ’
आणि मी हसून म्हणायचो – ‘तुझ्या हातचा असेल तर दहा
कपही चालतील.’ आता चहा आहे, पण तुझी आई नाही.
आज प्रदक्षिणा संपवून तू माझ्या शेजारी बसली होतीस त्यावेळी
तू तिच्या जागी उभी होतीस . मी तुझ्यात तिला पाहिलं.
तिच्या आठवणींनी माझं आयुष्य व्यापलंय, पण आता त्या
आठवणींबरोबर जगायला शिकलो पाहिजे हे आज मला कळले
आहे .”
त्यांचा हात नीताने धरला . बाबा आज पहिल्यांदा माझ्यासमोर
रडले.
“नीता, मला वाटायचं की ती फक्त गृहिणी होती. पण तिच्या
जाण्याने समजलं की ती आमचं घर होतं. ती गेली, आणि घर
घरासारखं राहिलंच नाही.”
“आईचं काय आठवतं बाबा, सगळ्यात जास्त?” नीताने विचारलं.
“एकदा सर्दीमुळे माझा आवाज गेलेला व नेमके त्याच वेळी आमचं
छोटसं भांडण झालं होतं , अबोला होता . त्यावेळी तिने एका
ओळीत पत्र लिहिलं होतं – ‘तुझं शांत होणं मला मारून टाकेल ’
त्या दिवसापासून मी कधीही तिच्याशी अबोला धरला नाही. ”
बाबा हुंदके देत सांगत होते.
वाटलं होतं की ही वटपोर्णिमा खूप वेगळी असेल पण यातही आई
होती – आठवणीत, शब्दांत, अश्रूंमध्ये आणि त्या वडाच्या
सावलीत.
बाबा आता आईच्या नसलेल्या अस्तित्वातही तिचं प्रेम शोधत
होते. आणि नीता त्यांच्या त्या प्रवासात सोबती होते.
आई नसली तरी तिची आठवण होती. वडाच्या झाडासारखी.
स्थिर, शांत आणि छाया देणारी.
बाबा आता तिच्या आठवणींसोबत नव्यानं जगायला शिकत होते.
वटपोर्णिमा संपली. पण मनात तिची सावली उमटून राहिली होती
Khup chhan
उत्तर द्याहटवाखुप छान कथा आहे ़आपलया जवळची व्यक्ती गेल्यावर त्याची आठवण सावली सारखी सोबत असते हे खरंय
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाखूपच सूंदर आहे कहाणी
उत्तर द्याहटवा