मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

शुक्रवार, २ मे, २०२५

एक अविस्मरणीय व्यक्ती “ मोनिकाच्या आई “






माझं मनोगत – मोनिकाच्या आईसाठी


माझी मैत्रीण मोनिका हिचा फ़ोन आल्यापासून म्हणजे आज सकाळपासून माझे मन सुन्न झाले आहे …

मोनिकाच्या आईच्या निधनाची बातमी मिळाल्यापासून मनावर एक विचित्र शांतता  आली आहे – जी खऱ्या अर्थानं शांतता नाही, तर ती एक आतून हलवून टाकणारी वेदना आहे. त्या गेल्या… पण माझ्या मनात अजूनही त्या आहेत – त्यांच्या हसण्याच्या लहरी, त्यांच्या सवयी, त्यांनी दिलेली माया,त्यांचे निटनेटके राहणे..त्या एका व्यक्तीचे स्थान मरेपर्यंत माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसले आहे 


मोनिकाची आई – म्हणजे फक्त तिची आई नव्हती माझ्यासाठी.

ते नातं केव्हा कधी माझं झालं, आईसारखं जवळचं झालं, तेच कळलं नाही. सुरुवातीला भेट झाली तेव्हा त्या केवळ “मोनिकाची आई” होत्या – सौम्य बोलणं, नितळ हास्य, प्रत्येक गोष्टीतली नजाकत, आणि माणसांबद्दलचा आदर, त्यांची  मायेने जवळ घेण्याची, पापे घेण्याची सवय हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होतं. त्यांची  ही मिठी मारण्याची व पापे घेण्याची सवय सुरुवातीला खटकायची पण जसजसा वेळ गेला, त्यांचा सहवास वाट्याला आला, तसतसं मी अनुभवायला लागले – त्या वेळी खरी आईची माया त्या स्पर्शातून जाणवू लागली होती , त्या फक्त त्यांनी जन्म दिलेल्या मुलींच्या आई नव्हत्या तर प्रत्येक मुलीसाठी प्रेमाने जवळ घेणारी आई होती .

त्यांचे व माझे वेगळेच ऋणानुबंध जुळले होते. त्यांच्या धाकट्या मुलीला मुग्धाला त्या माझ्यात बघायच्या. माझ्या गुढग्याच्या दुखापती मध्ये त्यांनी दिलेली साथ मी कधीच विसरू शकणार नाही. दवाखान्यात एक दोन वेळा त्या माझ्यासोबत आल्या होत्या त्यावेळी मी तिची आईच आहे असा उल्लेख केला होता. त्यावेळी  माझी आई माझ्या पाठीमागे  खंबीर उभी आहे  अशी जाणीव झाली. त्यांनी तोंड भरून केलेले कौतुक आजही मनाला उभारी देत असते. 

मोनिकाच्या बाबांच्या अकस्मात निधनानंतर त्या कोलमडून पडल्या होत्या पण काळ त्यावरचे औषध ठरले. मी त्यांचे ते दुःख व काकांचे त्यांच्यावरचे प्रेम पाहून एक कथा लिहिली होती. ती कथा वाचून त्या भारावून गेल्या होत्या 


घरात शिरल्या की त्यांचं अस्तित्व जाणवतं – घर व्यवस्थित, स्वच्छ, प्रत्येक वस्तू जागच्या जागी. पण त्या केवळ घर सांभाळत नव्हत्या, त्या माणसंसुद्धा जोडत होत्या. कोण येणार, कोण किती वेळ थांबणार, कोणाला काय आवडतं, सगळं त्यांच्या लक्षात असायचं. त्यांच्या हातची तेल पोळी कधीच विसरणार नाही – कारण ती मायेची असायची.


माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा मी अडचणीत होते, मनाला आधार हवा होता, तेव्हा त्यांच्या एका वाक्यानं,  “सगळं ठीक होईल ग, काळजी करू नकोस” – हे वाक्य त्यांच्या तोंडून येताना असं वाटायचं की खरंच काही वाईट होणारच नाही.


त्यांचं जीवन शिस्तबद्ध होतं, पण त्यात मोकळेपणा होता. या वयातही प्रचंड उत्साह होता, अभिनयाची झलक आम्हाला पाहायला मिळायची. 

त्यांनी कधी आपलं मत लादलं नाही, पण त्यांच्या सल्ल्यात इतकी प्रगल्भता होती की आपोआप त्यांचं ऐकावंसं वाटायचं. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांततेचं तेज असायचं – जे खूप काही सांगून जायचं.


मोनिकाच्या आईनं मला शिकवलं की माय म्हणजे केवळ जन्म देणारी स्त्री नाही, तर ती असते जिचा ओलावा मनात घर करतो. त्यांच्या वागण्यातली ती ममतेची झुळूक माझ्या आयुष्यात नेहमी राहील.


आज त्या नाहीत यावर विश्वास बसत नाही.

घरात प्रवेश करताच त्या हसून “ये गं” म्हणायच्या , “बरं वाटतंय का?” हा प्रश्न, सगळं डोळ्यासमोरून जात नाही. त्या गेल्या, पण त्या आठवणी कशा जातील? त्या तर मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात घर करून बसल्या आहेत.


आज मला मोनिकाची खूप आठवण येतेय, तिचा दु:ख फार मोठं आहे.

पण त्याचबरोबर मला स्वतःचंही दु:ख जाणवतंय – कारण मी फक्त मोनिकाची आई गमावली नाही, मी माझ्या दुसऱ्या आईला गमावलंय. मी त्या माणसाला गमावलंय ज्यांनी माझ्या भावना ओळखल्या, आणि नाती जपण्याचा खरा अर्थ शिकवला. मला पुढे जाण्यासाठी कौतुकाचा थाप पाठीवर दिली 


त्या व्यक्तीबद्दल कितीही लिहिलं, बोललं, तरी अपुरंच वाटतंय.

त्यांनी आयुष्यभर प्रेम दिलं, पण त्याचा गवगवा केला नाही. त्यांनी आनंद वाटला, पण त्याबद्दल श्रेय घेतलं नाही. त्यांचं आयुष्य म्हणजे एक सुंदर कविता होती – साधी, सरळ, पण मनात खोलवर उतरून जाणारी.


आज त्यांच्या आठवणींचा दरवळ मनात भरून राहिलाय.

कधी एखादे कोकणी  सुरातले नाटक पाहिले तरी त्यांची आठवण येईल, कधी साध्या पण कडक साडीत एखादी  भारदस्त बाई दिसली, तरी त्यांच्या सोज्वळ चेहऱ्याची आठवण होईल.


त्यांचं जाणं म्हणजे एक युग संपल्यासारखं आहे. पण त्यांची शिकवण , त्यांचं प्रेम, त्यांची माया, त्यांचा  उत्साह – हे सगळं अजूनही आपल्यात जिवंत आहे.

त्या गेल्या नाहीत, त्या फक्त आपल्या नजरेआड झाल्या आहेत.

त्या मनात आहेत, स्मृतीत आहेत, आणि नेहमी राहतील.


आई, तुमच्या आठवणींच्या ओलाव्यात आम्ही आयुष्यभर भिजत राहू.

तुमचं प्रेम आमच्यासोबत होतं, आहे आणि सदैव राहील…


२ टिप्पण्या:

  1. माझ्या डोळ्यासमोरून त्यांचा हसरा चेहरा हटत नाही देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो 😞

    उत्तर द्याहटवा

comment

नक्की वाचा

एक अविस्मरणीय व्यक्ती “ मोनिकाच्या आई “

माझं मनोगत – मोनिकाच्या आईसाठी माझी मैत्रीण मोनिका हिचा फ़ोन आल्यापासून म्हणजे आज सकाळपासून माझे मन सुन्न झाले आहे … मोनिकाच्या आईच्या...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template